संधिवातामधील झोप
डॉ कर्नल वर्गीस कोशी
झोप ही शरीरातील सर्वात मूलभूत आणि अनिवार्य कार्यांपैकी एक आहे. ती आपल्याला बरे करते आणि टवटवीत करते कारण शांत पुरेशी झोप चैतन्यदायी असते. झोपेची कमतरता म्हणजेच झोप न लागणे हे मानवी शरीरासाठी आणि शरीर स्वास्थ्यासाठी खूप हानिकारक असू शकते. त्यामुळे आजार होऊ शकतात. झोपेची कमतरता ही केवळ संधिवात विकार असलेल्या रुग्णांनाच नाही तर एक ठळक आणि गांभीर्याने घ्यावे असा मोठा विकार असू शकते. कमी झोपेमुळे अनेक विकार जडतात आणि आहेत ते बळावतात. असे मानले जाते की झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह, लठ्ठपणा, रक्तवाहिन्यासंबंधी विकार (हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक), मन-मेंदू विकार आणि बर्याचदा अकाली वृद्धत्व देखील येऊ शकते.
प्रथम सामान्य मानवी झोपेचे शरीरशास्त्र थोडेसे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लहान बाळे आणि मुले, प्रौढांपेक्षा जास्त झोपतात. वयानुसार झोपेची आवश्यकता कमी होते. झोपेचे दोन व्यापक टप्पे आहेत, आरईएम (रॅपिड आय मूव्हमेंट)झोपेत होणारी डोळ्यांची जलद हालचाल आणि एनआरईएम (नॉन रॅपिड आय मूव्हमेंट) झोपेचे टप्पे. एकूण झोपेच्या अंदाजे 25% REM व्यापते आणि NREM 50-60% आहे. पॉलीसमनोग्राफी म्हणजे झोपेच्या विविध इलेक्ट्रोफिजियोलॉजिक पॅरामीटर्सचे रेकॉर्डिंग आणि अभ्यासासाठी तेथे "स्लीप लॅब" आहेत कि जिथे पॉलीसोम्नोग्राफी चाचण्या रेकॉर्ड केल्या जातात. आजच्या प्रगत जगात अशा कंपन्या आहेत ज्या घरी झोपेच्या चाचण्या इंटरनेटद्वारे घेऊ शकतात.
स्लीप डिसऑर्डरचे (झोप न येण्याची किंवा निद्रानाशाचे) आंतरराष्ट्रीय वर्गीकरण (ICSD) नुकतेच केले असून ते लक्षणांवर आधारित आणि झोपेच्या विकारांचे वर्गीकरण करून केले आहे. त्यासाठी एखाद्या व्यक्तीवर आणि शरीराच्या प्रणालीवर कसा परिणाम होतो ते पुढीलप्रमाणे अभ्यासले जाते.
अ) निद्रानाश-
तुम्हाला झोप येण्याला आणि स्वस्थ्य झोप लागायला त्रास होतो. (उदा. तीव्र निद्रानाश)
ब) झोपेशी संबंधित श्वासोच्छवासाचे विकार-
तुम्ही झोपत असताना तुमचा श्वास बदलतो (उदा. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया)
क) अतिनिद्राचे विकार-
तुम्हाला दिवसा जागे राहण्यास त्रास होतो म्हणजेच सतत झापड येते. (उदा. नार्कोलेप्सी)
ड) सर्केडियन रिदम स्लीप-वेक डिसऑर्डर- तुमच्या अंतर्गत घड्याळामुळे झोप येणे आणि वेळेवर जागे होणे कठीण होते (उदा. रात्रपाळी-दिवसपाळी डिसऑर्डर)
इ) पॅरासोम्निया-
शारीरिक क्रिया किंवा शाब्दिक अभिव्यक्ती झोपेच्या दरम्यान होतात. उदा. झोपेत चालणे, बोलणे किंवा खाणे.(REM झोपेचे वर्तन विकार)
फ) झोपेशी संबंधित हालचाल विकार-
झोपेत न कळत शारीरिक हालचाली किंवा हालचाल करण्याची इच्छा होऊन यामुळे झोप लागणे कठीण होते. (उदा. अस्वस्थ पाय हालचाल)
पुढील लक्षणांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे
1. झोप लागण्यास त्रास होणे किंवा नियमितपणे झोप येण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणे.
2. रात्रभर झोप लागण्यास अडचण येणे किंवा तुम्ही अनेकदा मध्यरात्री जागे होता आणि पुन्हा झोप येत नाही.
3. झोपेच्या वेळी घोरणे, दम लागणे किंवा गुदमरणे असे काही प्रकार होतात.
4. आराम करतांनाही तुम्हाला हालचाल करावी असे वाटणे.
5. तुम्ही जागे झाल्यावर हलू शकत नाही असे वाटणे.
6. दिवसा झोप येणे- तुम्ही दिवसा वारंवार डुलकी घेता किंवा कामे करताना झोपी जाता.
7. लक्ष केंद्रित करण्यात किंवा लक्ष देण्यात अडचण येणे.
8. चिडचिड होणे, लवकर आणि वारंवार राग येणे, रडू येणे आणि इतर भावनिक समस्या असणे.
संधिवातामध्ये तीव्र आणि असह्य वेदनांमुळे झोपेत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रुग्ण ताजातवाना नसतो. रुग्णाच्या वेदना आणि अस्वस्थता वाढू शकते आणि यामुळे एक दुष्टचक्र सुरू होऊ शकते आणि आजार बळावतो.
RA रूग्णांमध्ये झोपेचे विकार उदा. खंडित झोप, एपनिया, रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम (RLS) किंवा निद्रानाश. RA मुळे होणारा दाह अथवा जळजळ, तसेच सायटोकिन्स नावाचे दाहक पदार्थ, यांमुळे झोपेचे नियमन आणि गुणवत्ता यात व्यत्यय येऊ शकतो.
RA आणि झोप यांचा दुहेरी संबंध आहे. RA शी संबंधित बऱ्याच यंत्रणा झोपेवर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे रुग्णांमध्ये वेदना, थकवा बळावून रुग्णाच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
कुणालाही झोपेचा त्रास जाणवू शकतो, तथापि, झोपेचा त्रास एखाद्याच्या जीवनावर, कामावर आणि नातेसंबंधांवर परिणाम करू लागतो. अशा स्थितीत प्रथमतः ही समस्या ओळखावी आणि आपल्या संधिवात तज्ञाशी मनमोकळा संवाद साधावा. झोपेचा त्रास RA च्या अपुऱ्या रोग नियंत्रणामुळे होऊ शकतो. अर्थातच कोणत्याही संधिवात तज्ज्ञासाठी पहिली पायरी म्हणजे झोपेच्या व्यत्ययाचा विचार करुन RA आजारांवर नियंत्रण सुनिश्चित करणे. रुग्णाच्या आरोग्यासाठी झोपेचा कालावधी आणि गुणवत्ता महत्त्वपूर्ण आहे.
झोपेचा अभ्यास केल्यानंतर, उपचार करण्यायोग्य झोप विकार नसल्यास, या काही सामान्य टिप्स तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करू शकतात.
1. प्रत्येक रात्री एकाच वेळी झोपायला जाऊन आणि दररोज त्याच वेळी जागे होऊन एका सुसंगत वेळापत्रकाची सवय लावणे.
2. झोपेसाठी तुमची बेडरूम पुरेशी थंड, शांत आणि अंधारी असावी.
3. रात्री उशीरा सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी, झोपण्यापूर्वी वेदनाशामक औषध घ्या.
4. योग्य पलंग विकत घ्या - मेमरी फोम किंवा तत्सम गादी आणि उशी सांधे दुखणाऱ्यांसाठी अधिक आरामदायक असू शकते.
5. व्यायाम करा, पण खूप उशिरा किंवा चुकीच्या वेळी करू नका. नियमित, सातत्यपूर्ण आणि वैयक्तिक क्षमतेनुसार मध्यम व्यायाम हे सर्वोत्तम झोपेचे टॉनिक आहे. झोपेच्या थोडाच वेळ आधी व्यायाम केल्याने तुमच्या शांत झोपेत व्यत्यय (disturbance) येऊ शकतो.
6. तुमचा बिछाना फक्त झोप आणि सेक्ससाठी आहे हे लक्षात घ्या. - अंथरुणावर पडून टीव्ही पाहू नका.
7.संज्ञानात्मक (Cognitive) वर्तवणूक थेरपी - ही थेरपी संधिवाताच्या संपूर्ण व्यवस्थापनात मदत करू शकते आणि तुमच्या झोपेच्या समस्या कमी करू शकते.
“माझ्या सर्व प्रिय रूग्णांना खूप शांत आणि चैतन्यदायी झोपेसाठी शुभेच्छा”.